महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. शुभांगी दसवडकर यांना संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयातर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्रथम वर्ष स्वागत समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रु. 5000 रोख रक्कमेचा समावेश होता.
डॉ. शुभांगी दसवडकर यांना चौदा वर्षांहून अधिक संशोधनाचा अनुभव असून त्यांचे ४४ शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्यांनी मॉलेक्युलर डॉकींग, विश्लेषणात्मक पद्धतींची निर्मिती व प्रमाणीकरण, तसेच हर्बल घटकांचे पृथ:करण आणि वैशिष्ट्यीकरण या क्षेत्रात संशोधन केले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी विविध प्रेझेंटेशन सादर केली आहेत आणि काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, आणि पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये मार्गदर्शन करत शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे संस्थेचे नाव उंचावले आहे.
संशोधनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, असे संस्थेचे संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी नमूद केले. प्रा. डॉ. शुभांगी दसवडकर यांचे अभिनंदन करत त्यांनी संस्थेच्या संशोधन परंपरेला अधिकाधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
