ग्रीन वर्ल्ड बुक आणि लिम्का बुकमध्ये नोंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या ७४५ व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मोरया मंगल कार्यालय, आळंदी देवाची येथे उत्साहात पार पडले.
या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्षपद नाशिकच्या कवयित्री प्रा. सुमतीताई पवार यांनी भूषवले. कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर, सहसंयोजक अजित वडगावकर, डॉ. दीपक पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि स्वागताध्यक्ष डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी प्रमुख भूमिका पार पाडली.
उद्घाटन प्रसंगी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. फाउंडेशनतर्फे मान्यवरांचा सत्कार मानपत्र, स्मृतीचिन्ह, पुस्तक आणि विशेषांक भेट देऊन करण्यात आला. ग्रंथदिंडीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या २०० विद्यार्थ्यांनी संतांच्या व वारकरी वेशभूषेत, टाळ-मृदुंगाच्या गजरात सहभाग घेतला.
या प्रसंगी साकारलेल्या संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताई यांच्या वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेष आकर्षण ठरलेली संत मुक्ताई यांनी ज्ञानेश्वर महाराजांना बांधलेली ७५० फूट लांब आणि १०१ किलो वजनाची राखी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली.
ही राखी एमआयटी महाविद्यालयाच्या स्वाती चाटे-कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. संमेलनात आयोजित परिसंवादांमध्ये “ओळख श्री ज्ञानेश्वरी” व “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” या विषयांवर चर्चा झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कटपुतली शो, भजन, पोवाडे आणि भक्तिगीतांनी रंगत भरली.
समारोप सत्राचे अध्यक्ष डॉ. शिवानंद भानुसे यांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. कवी संमेलनात विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवींनी अध्यात्मिक कविता सादर केल्या. संमेलनाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.
