सायबर चोरट्यांनी ३ लाखांना घातला गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २ लाख ८७ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कोथरूड येथील डहाणुकर कॉलनीतील ६५ वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १३ ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी असताना त्यांना स्वतःला बँकेतून बोलत असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला.
केवायसी अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते बंद होईल, असे सांगत भिती दाखवली. त्यानंतर फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरायला सांगण्यात आले. लिंकवरील माहिती भरल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोबाईल अॅक्सेस मिळवून बँक खात्यातून २ लाख ८७ हजार ९०० रुपये काढून घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. कोणत्याही मोबाइल कॉलवर किंवा एसएमएसवर विश्वास ठेवण्याआधी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येते. कॉल दरम्यानही सायबर क्राईमविषयी माहिती देणारा कॉलर ट्यून संदेश ऐकू येतो.
कोथरूडमधील डहाणुकर कॉलनी ही शहरातील सर्वाधिक सुशिक्षित रहिवाशांची कॉलनी म्हणून ओळखली जाते. तरीही येथील नागरिक सायबर चोरट्यांच्या फसवणुकीला बळी पडत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.
















