हडपसर परिसरातून अफूच्या बोंड्यांचा चुरा जप्त; राजस्थानहून आणल्याचा संशय
पुणे : हडपसर परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीकडून पुणे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ८३ हजार रुपयांचा अफूच्या बोंड्यांचा चुरा (पॉपीस्ट्रा) जप्त केला आहे. राजस्थानमधून हा चुरा आणल्याचा संशय आहे.
सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय ३०, रा. बिग मार्ट शेजारी, चिंतामणीनगर, हडपसर, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार ११ जानेवारी रोजी हडपसर परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे आणि राहुल शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सय्यदनगर येथील चिंतामणीनगरात एक व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. सुमेरलाल चौधरी हा अॅक्टीवा दुचाकीवरून आल्यावर त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे ६१५ ग्रॅम पॉपीस्ट्रा (अफूच्या बोंड्यांचा चुरा) आढळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडून अंमली पदार्थ, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण ८३ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे आणि पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे, राहुल शिंदे, शंकर नेवसे, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, अमोल सरडे, गणेश थोरात, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण व नागनाथ राख यांच्या पथकाने केली.
