पोलिसांनी एकाच दिवशी ९ ठिकाणी कारवाई करून हजारोंचा मांजा केला जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नायलॉन मांजामुळे दुचाकीचालकांच्या गळ्याला जखम होऊन त्यात त्यांच्या जीवावर बेतले आहे. शहरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. पक्षांच्या पायात हा मांजा अडकून त्यात त्यांचा जीवही जातो. अग्निशामक दलाकडील नोंदीनुसार पुण्यात गेल्या ५ वर्षांत ४ हजार ८२ पक्षी मांजामध्ये अडकलेले आढळले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. असे असतानाही पुणे शहरात नायलॉन मांजाची सर्वत्र विक्री सुरू असल्याचे दिसून येते. शहर पोलिसांनी एकाच दिवशी ९ ठिकाणी कारवाई करून हजारों रुपयांचा मांजा जप्त केला आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल पाटील यांच्या माहितीवरून पोलिसांनी योगेश शत्रुघ्न शहा (वय २०, रा. नेवसे हॉस्पिटलजवळ, वडगाव बुद्रुक) याला मांजा विक्री करताना पकडले. त्याच्याकडून ६ हजार ५०० रुपयांचे ११ रिळे नायलॉन मांजा जप्त करण्यात आले आहेत.
वारजे माळवाडी येथील रामनगर कॅनॉल रोडवरील गायत्री जनरल स्टोअर्स येथे सौरभ संतोष पाष्टे (वय १८, रा. खडकमाळ आळी) आणि यश निलेश पेटकर (वय २०, रा. राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) यांना नायलॉन मांजा विक्री करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४५ रिळे मांजा जप्त करण्यात आले आहेत.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाला मित्र मंडळ चौकाकडून पर्वतीकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवरील अंतर्गत रोडवर दोघे जण नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शशांक चंद्रप्पा धनगर (वय १९, रा. गणेश मळा, सिंहगड रोड) आणि रोहित राम शिंदे (वय ३४, रा. पर्वती दर्शन) यांच्याकडून ४ हजार ८०० रुपयांच्या चायनीज नायलॉन मांजाच्या ६ चक्र्या जप्त केल्या आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल गाडे व हरीष मोरे यांना बातमी मिळाली. त्यावरून येरवड्यातील मच्छी मार्केटमधील शेलार चाळ येथील दिपा शिंदे (वय ३७) हिच्याकडून ३ हजार २०० रुपयांचा नायलॉन मांजाची चार चक्र्या जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट १ कडील पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तळजाई पठार येथून एका अल्पवयीन मुलाकडून ४ हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
औंध मस्जिद जवळील बसस्टॉप शेजारी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या रुपेश नितीन साळुंखे याच्याकडून चतु:श्रृंगी पोलिसांनी १३ हजार २०० रुपयांचा ११ रिळे मांजा जप्त केला आहे. कात्रज येथील भगवा चौकात एक अल्पवयीन मुलगा नायलॉन मांज्याची विक्री करताना आढळून आला.
पाषाण येथील पाषाण – सुस रोडवरील साई चौकात नायलॉन मांजा विकला जात होता. बाणेर पोलिसांनी विवेक सुरेश सोळंकी (वय १९, रा. कृष्णविहार सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याच्याकडून ४ हजार ५०० रुपयांचा ३ रिळे नायलॉन मांजा जप्त केला आहे.















