चारित्र्याचा संशय, सिंहगड रोडवरील नर्हे येथील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
रेश्मा भिकु खुडे (वय ३२, रा. कुटे मळा, मानाजीनगर, नर्हे, मुळ रा. वडुज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मुळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे. ही घटना नर्हेमधील मानाजीनगर येथील कुटे मळा येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा खुडे हिचा पहिला विवाह झाला होता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. त्यानंतर तिने कुमार पाटील बरोबर विवाह केला. एक महिन्यांपूर्वीच ते नर्हेमध्ये राहायला आले होते. कुमार कलगोंडा पाटील हा सासवड येथील एका लॉजवर काम करत होता.
तो एक-दोन दिवसांनी पुण्यात घरी येत असे. त्याला रेश्मा हिच्या चारित्र्याचा संशय होता. शुक्रवारी सायंकाळी कामावरून घरी परत आल्यावर त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाले. रागाच्या भरात कुमार पाटील ने रेश्मा हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला, त्यात तिचा मृत्यू झाला.
या दोघांचा आवाज ऐकून घरमालक तेथे आले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि त्यांना रेश्मा निपचित पडलेली दिसली. त्यांनी ११२ ला फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुमार पाटील याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील करीत आहेत.















