परस्पर कर्ज घेऊन केली फसवणूक : शुष्को युनिकॉर्नच्या चालकांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इलेक्ट्रिक बाईकसाठी कर्ज मंजूर करून बाईक देतो, असे सांगून त्या बाईकबरोबर फोटो काढून घेतले. त्यानंतर ते फोटो फायनान्स कंपनीला पाठवून ग्राहकांना गाड्या दिल्याचे भासवून त्यांच्या कर्जाचा अपहार केला. शुष्को युनिकॉर्न प्रा. लि. च्या चालकांनी ५ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केली, असा प्रकार समोर आला आहे. या चालकांनी आणखीही काही जणांची फसवणूक केली असण्याचा संशय आहे.
याबाबत पुजन चंद्रशेखर गोडबोले (वय ४४, रा. साळुंखे विहार आर्मी सोसायटी, कोंढवा) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शुष्को युनिकॉर्न प्रा. लि. चे चालक आकाश देविदास शिंदे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित दामोदर, कंपनीचे सहचालक अमित गोरख सरक व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार स्वारगेट येथील नटराज हॉटेल शेजारील अमर साकेत बिल्डिंगमध्ये डिसेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक बाईकच्या खरेदीसाठी शुष्को युनिकॉर्न कंपनीच्या लोकांनी फिर्यादी व इतर लोकांची कागदपत्रे घेतली.
फिर्यादी आणि रोहित जाधव यांच्या नावे प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये, सुरेश रमेश ताये, विनोद सत्तार व सुप्रिया परमेश्वर इंगोले यांच्या नावे प्रत्येकी १ लाख ८ हजार रुपये असे कर्ज प्रकरण केले. कर्ज देऊन त्यांच्यावर इलेक्ट्रीक बाईक देऊ, असे आश्वासन दिले.
मोनॅडो फायनान्स प्रा. लि. मध्ये कर्ज मंजूर करून घेतले. ही रक्कम शुष्को युनिकॉर्न प्रा. लि. च्या खात्यामध्ये घेतली. सर्वांचा इलेक्ट्रिक बाईक गाडीसोबत व्हिडिओ बनविला. त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन एका बॉंड पेपरवर सही करून घेतली. ही सर्व कागदपत्रे व व्हिडिओ मोनॅर्डा फायनान्स कंपनीला पाठवून दिले.
सर्वांना गाडी दिली आहे, असे भासवले. सर्वांची कर्जाची ५ लाख ५६ हजार रुपये रक्कम कंपनीच्या खात्यात घेतली आणि ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. तसेच इतरही अनेकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. प. शिरसाट तपास करीत आहेत.
