तातेड परिवाराच्या वतीने मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : मातोश्री श्रीमती फुंदाबाई नेमीचंदजी तातेड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग २३ व्या वर्षी अखंडित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अशोकजी सागरजी तातेड परिवाराच्या वतीने आयोजित या शिबिरात २२१ रक्तदात्यांनी रक्तदान करून या सेवायज्ञात सहभाग नोंदविला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्ञानप्रबोधिनी, निगडीचे केंद्रप्रमुख विद्यावाचस्पती मनोजराव देवळेकर यांच्या शुभहस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी दीपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष रांका होते. प्रमुख पाहुणे म्हणून आकुर्डी श्री संघाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी आणि पुणे मर्चंट चेंबरचे माजी सचिव उद्योजक अशोक लोढा उपस्थित होते.
या वेळी गुरु आनंद प्रार्थना मंडळ व चंदनबाला महिला मंडळ यांच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून तातेड परिवाराच्या वतीने अखंडितपणे रक्तदान शिबिरे आयोजित केली जात असून, आतापर्यंत ३३३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या वर्षी २२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा, सागर, एकता, समर तातेड व तातेड परिवाराने केले. रक्तदात्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विशेषत: सागर तातेड व एकता तातेड यांनी देखील रक्तदान केले.
तातेड परिवार गेली अनेक वर्षे आषाढी व कार्तिकी एकादशीला वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था नियमितपणे करत आहे. या उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शारदा चोरडिया यांनी केले.
