हरवलेले १० मोबाईल मालकांना परत : शिवाजीनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर येथील एका घरातून पैसे आणि मोबाईल चोरून पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अटक केली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने चोरलेले पैसे मौजमजेत खर्च न करता बँकेत ठेवले होते. पोलिसांनी बँकेतील सर्व रक्कम गोठवून ती जप्त केली. याशिवाय, एका लाख रुपयांचा आयफोनही पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव डेबज्योती करुणामय डे (वय २८, रा. खरागपूर, पश्चिम बंगाल) असे आहे. त्याने एका घरात घुसून ७ लाख २० हजार रुपये आणि आयफोन चोरी केला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेऊन चोरलेली सर्व रक्कम आणि वस्तू जप्त केल्या.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी गेल्या दोन वर्षांत उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने केवळ पंधरा दिवसांत २०२३ आणि २०२४ मधील सात गुन्ह्यांची उकल केली आहे.
शिवाजीनगर परिसरात हरवलेल्या मोबाईलसाठी पोलिसांच्या “लॉस्ट अँड फाऊंड” विभागात तक्रारी दाखल केल्या जातात. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून १० मोबाईल आणि १ लॅपटॉप मूळ मालकांना परत केले.
तसेच, २०२३ मध्ये जबरी चोरी करून फरार असलेल्या उसामा शफिक शेख (वय २३, रा. सैय्यदनगर, हडपसर) याला अटक करून ४५ हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आशिष रामदास मानकर (वय ४८, रा. वाघोली) यालाही अटक करण्यात आली. याशिवाय, वस्तू खरेदी करताना झालेली ५ हजार रुपयांची फसवणूक बँकेकडून परत मिळवून देण्यात आली आहे.
अर्जदाराची ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर त्वरीत संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून २८ हजार रुपये अर्जदाराला परत मिळवून देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस अंमलदार नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, अर्जुन कढाळकर आणि रुचिका जमदाडे यांनी ही कामगिरी केली.
