नफ्याबाबत खोट्या नोंदी ठेवून केली फसवणूक
महारष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: क्लोअर पिझ्झा आणि सिंहगड रोडवरील असी वेज या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला नफ्यातून हिस्सा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे गुंतवायला भाग पाडण्यात आले. त्यानंतर नफ्यातील हिस्सा न देता १४ लाख २४ हजार ४४० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत विपीन चंद्रकांत बिडकर (वय ३७, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण सूर्यकांत बिडकर (वय ३७) आणि जानकी किरण बिडकर (वय ३५, रा. सदगुरु पार्क, सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी व अरोरा टॉवर येथे २०१२ पासून आतापर्यंत सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या आईला किरण बिडकर यांनी क्लोअर पिझ्झा व असी वेज व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्यातून दरमहा हिस्सा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादी व त्यांच्या आईने वेळोवेळी पैसे दिले.
मात्र, नफ्याचा हिस्सा न देता, नफ्याबाबत खोट्या नोंदी तयार करून १४ लाख २४ हजार ४४० रुपयांचा अपहार करण्यात आला. तसेच फिर्यादींनी काढून दिलेल्या कर्जाचे हप्ते आरोपीने न भरल्याने, त्यांनी हप्ते भरण्यास सांगितले असता आरोपीने फिर्यादी यांच्या पत्नीला धमकी देत, “माझ्या काऊंटरवर पाय ठेवला तर तुझा जीव घेईन, तुझी विकेट काढीन,” अशी धमकी दिली.
त्याने गलिच्छ शिवीगाळ करत, “मी पुढे एकही ईएमआय भरणार नाही, तुला जे काही करायचे आहे ते कर,” असेही सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव करत आहेत.
