हडपसर पोलीस स्टेशनची कामगिरी : ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०१६ साली घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास नऊ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर घटना दि. २७ जून २०१६ रोजी डावरी नगर, लोखंडी पुलाजवळ, पाण्याच्या टाकीजवळ घडली होती. आरोपी गणेश सुभाष वाबळे (वय २४ वर्षे) याने कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या रागातून साथीदारांसह सागर नामदेव चौगुले याचा लाकडी दांडक्याने आणि सिमेंट ब्लॉकने ठेचून खून केला. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांनी पूर्ण केला व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दि. २१ जानेवारी २०२५ रोजी सबळ साक्षीपुराव्यावर निर्णय देत आरोपीस शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाचे कामकाज सहाय्यक सरकारी वकील निवेदिका काळे यांनी पाहिले, तर कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांनी सहकार्य केले. या कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे यांनी पोलीस निरीक्षक संदिप देशमाने आणि पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस मंजूर केले आहे.
