गुरुबाई विभुतेचा चित्रवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : दि. २१ जानेवारी २०२५ रोजी नगर येथे आयोजित राज्यस्तरीय वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत कुर्डूवाडी येथील मूकबधिर निवासी शाळेने सहभाग घेतला होता. वाचा कौशल्य या स्पर्धेमध्ये सिद्धी जंगाळे, वैष्णवी फुके, रवी गोडगे यांनी सहभाग नोंदवला, तर चित्रवाचन स्पर्धेत तनुजा जाधव व गुरुबाई विभुते या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
गुरुबाई विभुते हिने उत्कृष्ट चित्रवाचन सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिला शालेय सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
गुरुबाईच्या या यशाचे मूकबधिर निवासी शाळेचे अध्यक्ष अरुण बारबोले, मुख्याध्यापक रविंद्र जगताप आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
