अल्पावधीत पैसे कमाविण्याचा प्रयत्न आला अंगाशी : पोलिसांच्या जाळ्यात अडकला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फर्निचर बनविण्याचे काम करण्यासाठी यापूर्वी अनेकदा पुण्यात आलेल्या राजस्थानातील एका कारागीराने अल्पावधीत पैसे कमाविण्याच्या नादाने अफूची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोंढवा परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २१ कोटी ८० लाख रुपये किमतीचे १ किलो ९० ग्रॅम अफू हस्तगत करण्यात आले आहे.
नाथुराम जीवनराम जाट (वय ५२, रा. असावरी, तहसील मुंडवा, जि. नागोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देण्यासाठी तस्करीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.
त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना उन्नती धाम सोसायटीबाहेरील रोडवर एक संशयित इसम लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेऊन उभा असल्याचे दिसले.
पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता १ किलो ९० ग्रॅम अफू सापडले, ज्याची बाजारभावानुसार किंमत २१ कोटी ८० लाख रुपये आहे.
अधिक चौकशीत आरोपी नाथुराम जाट याने फर्निचर बनविण्याचे काम करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा पुण्यात आल्याचे सांगितले. मात्र, यावेळी लवकर पैसे कमावण्याच्या मोहामुळे त्याने अफू विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले.
या कारवाईत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, तसेच पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे पाटील, संदिप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे आणि योगेश मोहिते यांनी सहभाग घेतला.

















