खडक पोलीस ठाण्याची प्रभावी कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चोरीच्या वाहनातून फिरणार्या सराईत वाहन चोराला अटक करून खडक पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
दत्ता ऊर्फ सुमित लहू जाधव (वय २५, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड, मूळ रा. पानचिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर) असे या आरोपीचे नाव आहे. शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व गुन्हे निरीक्षक शर्मिला सुतार यांनी तपास पथकाला आदेश दिले होते.
तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना शेखर खराडे, विश्वजीत गोरे आणि संतोष बारगजे यांना बातमी मिळाली की, संशयित वाहनचोर शुक्रवार पेठेतील साठे कॉलनी येथे थांबला आहे.
तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे एक व्यक्ती होंडा प्लेजर मोटारसायकलसह उभा असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेऊन गाडीच्या मालकाविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीस खाक्या दाखवल्यावर त्याने सदाशिव पेठेतील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गल्लीतील मोकळ्या जागेतून गाडी चोरल्याचे मान्य केले. अधिक चौकशीत त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपये किमतीच्या ६ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
यात खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४, स्वारगेट पोलीस ठाण्यातील १ आणि खोपोली पोलीस ठाण्यातील १ असे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस उपयुक्त अनघा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक शर्मिला सुतार, राहुल गौड, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, प्रल्हाद डोंगळ, हर्षल दुडम, किरण ठवरे, शेखर खराडे, विश्वजीत गोरे, सद्दाम तांबोळी, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश मठपती, शोएब शेख, नंदा विरणक आणि सोनाली आडकर यांनी केली आहे.
