४३ मोबाईल हस्तगत; एका चोरट्यापासून सुरू झालेली साखळी उलगडली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट परिसरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत चोरीचे मोबाईल अनलॉक करून विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३२, रा. फिरस्ता, मूळ रा. दहीटणे, ता. दौंड) असे अटक केलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव असून मोहम्मद शाहिद इलियास अन्सारी (वय ३४, रा. हसना एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी, अल्ला हू अकबर बिल्डिंग, अशरफनगर, कोंढवा) असे चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्या दुकानदाराचे नाव आहे.
२२ जानेवारी रोजी स्वारगेट परिसरात गस्त घालत असताना पोलीस पथकाने पीएमपी बसस्टॉपवर वारंवार फिरत असलेल्या एका संशयित व्यक्तीला हटकले. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे तीन मोबाईल सापडले. त्याने स्वारगेट बसस्टॉपवर बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
अधिक चौकशीत, त्याने पुणे स्टेशन व स्वारगेट येथून चोरी केलेले इतर मोबाईल कोंढव्यातील त्याच्या ओळखीच्या मोबाईल दुकानदार मोहम्मद अन्सारी याला विकल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी अन्सारीच्या दुकानावर छापा घातला. या छाप्यात ४० चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.
पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, शहरातील विविध भागांतील मोबाईल चोरटे अन्सारीकडे मोबाईल विकत असत. तो मोबाईल अनलॉक करून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना परस्पर विक्री करत असे. यामुळे मोबाईल चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणाच्या चौकशीत आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सतीश शिरोळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे सहा गुन्हे आधीच दाखल आहेत.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कामगिरीत सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, सुजय पवार, दीपक खेंदाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे आणि संदीप घुले यांनी सहभाग घेतला.
