आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत

Spread the love

पुणे : चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला असो किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले असोत, हे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. बांगलादेशी नागरिकांचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले आहे. नागरिकांनी सतर्क राहून संशयितांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पुणे पोलिसांच्या वतीने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३ कोटी ८४ लाख रुपयांच्या ऐवजाचे वितरण ३०० फिर्यादींना करण्यात आले. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, संभाजी कदम, व स्मार्तना पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. घुसखोरांना शोधून त्यांच्या मायदेशी रवानगीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

पुणे व मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध लवकरच कारवाई सुरू होणार आहे. रस्त्यावरील फेरीवाले व मजूरही बांगलादेशी असल्याचा संशय बऱ्याच जणांना नसतो. नागरिकांनी अशी जबाबदारी झटकून चालणार नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल संशय आल्यास माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

याशिवाय, पुणे पोलीस दलासाठी लवकरच एक हजार नवीन पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दागिने, मोबाईल व वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला ऐवज फिर्यादींना परत करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.

जप्त ऐवज एका महिन्याच्या आत फिर्यादींना परत करावा, यासाठी न्यायालयीन पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पुणे शहर हे जगातील चौथे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे.

मात्र, अलीकडील काही दिवसांपासून पोलिसांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक गतिमान झाली आहे. अतिक्रमणांवर कारवाई, रस्त्यांची दुरुस्ती व वाहतूक सुधारणा यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे ही प्रगती झाली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.