आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जनता वसाहतीत सलग दोन दिवस वाहनांची तोडफोड

Spread the love

पुणे : जनता वसाहतीत जुन्या भांडणाच्या वादातून सलग दोन दिवस रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या. या घटनेत सर्वसामान्य नागरिकांच्या ४० वाहनांचे नुकसान झाले, त्यामध्ये ९ रिक्षांचा समावेश आहे.

याबाबत पोलीस अंमलदार आनंद चव्हाण यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सौरभ विनोद वीर (वय १९, रा. जनता वसाहत, पर्वती) आणि रितेश अशोक चंदनशिवे (वय २१, रा. पानमळा, दत्तवाडी) यांना अटक केली आहे. तसेच चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही घटना २८ जानेवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत गल्ली क्रमांक १५, १६ आणि १७ मध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीच्या वडिलांना मारहाण केल्याच्या जुन्या वादातून ६ ते ७ जणांचे टोळके जनता वसाहतीत आले.

त्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. त्यामध्ये २५ दुचाकी आणि ५ रिक्षा फोडण्यात आल्या. तोडफोडीचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या काही नागरिकांना टोळक्याने हातातील हत्यारे दाखवून दहशत निर्माण केली. पर्वती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांना अटक केली आहे.

यानंतर दुसरी घटना बुधवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास निलायम पुलाजवळील कॉर्नरवर घडली. सिंहगड रोडवरून आलेल्या टोळक्याने ४ रिक्षा आणि ४ दुचाकींच्या काचा फोडल्या. पर्वती पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, जनता वसाहतीतील प्रमुख टोळ्यांचे गुंड सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे हा प्रकार टोळी युद्धाचा नाही, तर जुन्या भांडणाच्या वादातून घडलेला आहे. पर्वती पोलीस अधिक तपास करत आहेत.