महानगरपालिकेचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात थकीत पाणीपट्टीधारक मालमत्तांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका वेळोवेळी अधिकृत ‘एसएमएस’द्वारे नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करत आहे. मात्र, काही फसवणूक करणारे व्यक्ती “आज रात्री ९ वाजता तुमचे नळकनेक्शन तोडण्यात येईल” अशा आशयाचा बनावट ‘एसएमएस’ पाठवत आहेत.
“देवेश जोशी, महापालिका अधिकारी” या नावाने तसेच 9309445824 / 9325848115 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करणारे हे संदेश फसवणुकीचे असून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
काही नागरिकांना “तुमच्या माहितीमध्ये बदल आहेत, कृपया हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा” अशा प्रकारचे मेसेज व्हॉट्सअॅपवर येत आहेत. या लिंकवर क्लिक करून कोणतेही ऍप्लिकेशन डाऊनलोड करू नये. कोणत्याही शंकेसाठी ८८८८००६६६६ या महानगरपालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे.
“महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून अधिकृत सिस्टिमवरूनच थकीत पाणीपट्टीसंदर्भातील ‘एसएमएस’ पाठवले जातात. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करावे व संभाव्य आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे.”
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
