उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा समन्वय साधून संबंधित यंत्रणांनी कार्य करावे. यासोबतच 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात वाहतूक सुधारणा उपाययोजना समाविष्ट कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित वाहतूक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
प्रमुख निर्णय आणि उपाययोजना
रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवावे.
वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करावी.
नवले पुलाची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत.
मेट्रो पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पीएमपीएलच्या बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात.
चाकण परिसरातील वाहतूक सुधारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आणि एमआयडीसीने समन्वय साधावा.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) उपयोग करावा.
बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने सुरू केली जाईल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. निधीची कमतरता पडू न देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
