८ पैकी ४ मागण्यांवर सरकारची सकारात्मकता : सहाव्या दिवशी उपोषण स्थगित
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : आंतरवली येथे सुरू असलेले सामूहिक आमरण उपोषण सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे आज सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. सरकारने आठपैकी चार मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून उर्वरित मागण्यांसाठी पुढील लढाई सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आज आंतरवलीतील सामूहिक उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, उर्वरित मागण्या मान्य न झाल्यास कोटींच्या संख्येत नियोजनबद्ध मुंबई दौरा करण्यात येईल, असे आंदोलक बार्शीचे आनंद काशीद यांनी उपोषण सोडताना सांगितले.
मान्य झालेल्या मागण्या
- कुणबी नोंदी शोधण्यासाठी मुदतवाढ – न्यायमूर्ती शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार.
- हैद्राबाद गॅझेटिअरचा तपास व कार्यवाही – शिंदे समिती हैद्राबाद गॅझेटिअर तपासून अहवाल सादर करेल व त्यावर उचित कार्यवाही होईल.
- गैर-गंभीर गुन्हे मागे – मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या (गंभीर वगळता) गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.
- कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेला गती – जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेले कक्ष सुरू करून प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला वेग दिला जाईल.
प्रलंबित व पुरवणी मागण्या
- न्यायमूर्ती शिंदे समितीचे मंत्रालयातील बंद कार्यालय त्वरित सुरू करावे.
- कुणबी प्रमाणपत्र वाटपातील जाचक अटी हटवून अडथळे आणणाऱ्या जातीवादी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- वंशावळ जुळवणारी समिती पुन्हा सुरू करावी, तसेच मोडी लिपी अभ्यासकांचे वेतन पुन्हा सुरू करून वाचन केंद्रे चालू ठेवावीत.
- मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे (गंभीर गुन्हे वगळून) पूर्णतः मागे घ्यावेत.
- बॉम्बे, सातारा आणि औंध गॅझेटिअर लागू करावे.
- EWS प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत याची हमी द्यावी.
- मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी.
- सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी.
