कोथरुडमधील घटना, चार अल्पवयीन मुले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: अनैतिक संबंधांमुळे एका तरुणावर अल्पवयीन मुलांनी पालघनने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
राहुल दशरथ जाधव (वय ३०, रा. उंबरे, ता. भोर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ केतन दशरथ जाधव (वय २७, रा. उंबरे, ता. भोर) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील सागर कॉलनीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जाधव हा पुणे महापालिकेतील ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करत होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. तो दररोज गावाकडे जाऊन येत होता आणि कोथरुडमध्ये नेहमी येत होता.
गुरुवारी सायंकाळी तो मोटारसायकलवर थांबला असताना तीन ते चार जणांनी पाठीमागून येऊन त्याच्यावर पालघनने डोक्यावर आणि हातावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना राहुल याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, राहुल याचे कोथरुडमधील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्याचा त्या मुलांवर राग होता. या कारणावरून त्याच्यावर अल्पवयीन मुलांनी पालघनने वार करून खून केला आहे. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक चंतन धनवडे तपास करीत आहेत.
