गुन्हेगारी रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणारे चौघे जेरबंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजामध्ये भीती व दहशत पसरवणारे व्हिडिओ, रील्स सोशल मीडियावर टाकणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन मारणे याच्या नावाने तब्बल १३ इंस्टाग्राम अकाऊंट अॅक्टीव्ह असल्याचे उघड झाले आहे.
अक्षय निवृत्ती शिंदे (वय २०, रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय १९, रा. महमंदवाडी, हडपसर), साहिल शादुल शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव) आणि इरफान हसन शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गज्या मारणे यांच्या समर्थकांनी मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रॅली काढली होती. त्याचे व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई झाली होती. तरीही अनेक जण त्याच्या नावाने गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत होते.
गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना माहिती काढण्याबाबत सांगितले होते.
इंस्टाग्राम अकाऊंटवर “किंग ऑफ पुणे सिटी मा. श्री गजानन महाराज मारणे”, “पुण्यातील गुन्हेगारीची मुंबईच्या टोळ्यांशी हातमिळवणी”, “किंग ऑफ महाराष्ट्र”, “पुण्याचा बाप कोण आहे”, “अख्या पुण्याला माहिती आहे” या नावाने व्हिडिओ रील्स, “यहा का मै हु किंग और मेरे चलते है रूल्स और उन रूल्स को आपने हिसाब से बदलता रहाता हू, तो उने चुपचाप फॉलो करो, अगर इसके अलवा और कुछ करने की कोशिश की, तो तेरे टुकडे टुकडे करके ताश तरह फैला दूंगा”, तसेच “किंग ऑफ पुणे सिटी, जस मुंबईत एकच दादर तसच पुण्यात एकच फादर” अशी धमकी देणारी व्हिडिओ रील्स प्रसारित केली गेली होती. गज्या मारणेच्या गाडीच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेराचा वापर करून फोटो घेऊन गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले होते.
या १३ इंस्टाग्राम अकाऊंट धारकांच्या विरोधात पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर टाकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल धावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, चेतन चव्हाण, संग्राम शिनगारे, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली आहे.
