लवकरच मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी सुरू : महापालिकेच्या हालचालींना वेग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे ७५% काम पूर्ण झाले असून, ज्या भागांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने सादर केला आहे. लवकरच या प्रस्तावावर महापालिकेच्या पातळीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
शहरातील सर्व भागांना सम प्रमाणात आणि अखंडित पाणीपुरवठा मिळावा यासाठी २०१६ मध्ये ३,००० कोटी रुपयांच्या योजनेला सुरुवात झाली. या योजनेत ८६ जलकुंभ, नवीन पाईपलाइन आणि अत्याधुनिक पाणी मीटर बसवले जात आहेत.
आतापर्यंत १.६८ लाख पाणी मीटर बसवले गेले असून, ६६ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. मात्र, काही टाक्यांची कामे जागा उपलब्ध नसल्याने रखडली आहेत. पाटबंधारे विभागाने २०३२ पर्यंतच्या ७० लाख लोकसंख्येसाठी १६.३२ टीएमसी पाणी कोटा निश्चित केला असला, तरी सध्या १२.८२ टीएमसीच मंजूर आहे.
प्रत्यक्षात पुणे शहराला २४ टीएमसी पाण्याची गरज आहे, मात्र २१.८२ टीएमसी पाणीच उचलले जात आहे. परिणामी, अनेक भागांत पाण्याची टंचाई असून, अनेक सोसायट्या टँकरवर अवलंबून आहेत. महापालिकेने पाणीपुरवठ्यातील ३५% गळती रोखण्यासाठी पाणीपट्टीत १००% वाढ केली आहे. मात्र, या योजनेमुळे गळती कमी झाली का? याचा अद्याप ठोस निष्कर्ष नाही.
त्यामुळे ज्या झोनमध्ये जलकुंभ, पाईपलाइन आणि मीटर बसवले गेले आहेत, त्या ठिकाणी मीटर रीडिंगनुसार पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे देण्यात आला आहे. यावर आयुक्तांच्या पातळीवर बैठकांमध्ये चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठा अधिक नियोजनबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.















