दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच : हवेली तहसील कार्यालयात सापळाकारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली अप्पर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात दाखले देण्यासाठी लाच घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भूमिहीन असल्याचा दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेताना दोन महिला संगणक ऑपरेटरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
अटक करण्यात आलेल्या महिला संगणक ऑपरेटर म्हणजे वंदना दिनेश शिंदे (वय ५०) आणि जयश्री रोहिदास पवार (वय ४५). एका ४८ वर्षीय तक्रारदाराने भूमिहीन असल्याचा दाखला मिळवण्यासाठी हवेली अप्पर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता.
दाखला मिळवण्यासाठी वंदना शिंदे यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. ३१ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली असता, वंदना शिंदे यांनी ४०० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली अप्पर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात सापळा रचला. तक्रारदाराकडून ४०० रुपये स्वीकारताना वंदना शिंदे हिला रंगेहात पकडण्यात आले. जयश्री पवार यांनी या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने दोघींविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांनी केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.
