व्हिडिओ व्हायरल : मुंढव्यातील हॉटेल लोकल बारला पोलिसांनी ठोकले टाळे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने ‘लोकल बार’ हॉटेल सील करून टाळे ठोकण्यात आले.
हॉटेल व बारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यास अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येतील, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
मुंढव्यातील एबीसी रोडवरील ‘कपिला मॅट्रिक्स’ या इमारतीतील ‘लोकल बार’ हॉटेलमध्ये ३१ जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजता ही घटना घडली.
या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक उत्तमराव कदम यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल कमलेश कुमार जैसवार, रोहित कमलेश कुमार जैसवार, रितिक सुरेश उडता (तिघेही राहणार मालाड, मुंबई) आणि नितेश शर्मा (रा. विमाननगर) यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ‘लोकल बार’ हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीत राहुल, रोहित आणि रितिक जखमी झाले होते. ते मुंढवा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी यादी देऊन ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, उपचारानंतर हे तिघे तक्रार देण्यासाठी परत आले नाहीत.
या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःच चौकशीस सुरुवात केली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी सुरू झाली.
पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली. त्यानंतर ‘लोकल बार’ हॉटेल सील करण्यात आले. तसेच, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या हॉटेलचा खाद्य परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हॉटेल आणि बारमध्ये वारंवार अशाप्रकारे वाद होत असतील आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर संबंधित हॉटेल व बार यांचे परवाने रद्द केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप करीत आहेत.