२ वकिलांसह ११ जणांना अटक, ९५ रेशनकार्ड, ११ आधार कार्ड, कागदपत्रे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कारागृहात असलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार उभे करुन त्याला जामीन मिळवून देण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून कोर्टात हे सर्व खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करुन जामीन मिळवून देण्याचे रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केले आहे.
या रॅकेटमधील २ वकिलांसह ११ जणांना अटक केली आहे. त्यात वकिलांबरोबर कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अॅड़ असलम गफुर सय्यद (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि अॅड़ योगेश सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या वकिलांची नावे आहेत.
ज्याच्या गुन्हेगाराच्या जामीनासाठी वकिलांसह इतरांनी खटपट केली. त्या न्यायालयीन कोठडीत असलेला गुन्हेगार संतोष शंकर तेलंग याने न्यायालयात १५ जानेवारी रोजी कबुली जबाब दिला़ त्यावरुन पोलिसांनी कारवाई केली.
मुख्य सुत्रधार फरहान ऊर्फ बबलु शेख (रा. वैदवाडी, हडपसर) आणि अॅड. नरेंद्र जाधव हे इतर दोन वकिलांशी संगनमत करुन इतरांच्या मदतीने बनावट जामीनदार उभे करुन जामीन करण्यास मदत केली. त्याचा मोबदला म्हणून रोख स्वरुपात पैसे दिले असल्याचे त्याने सांगितले.
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या रॅकेटची संपूर्ण माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुन्हेगारांना कोणी लायक जामीन मिळत नसे. त्यांना जामीनदार होण्यासाठी लोक घाबरत असतात.
त्यामुळे अशा गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकीलांच्या साथीने एक बनावट जामीनदारांचे रॅकेट निर्माण झाले होते. बनावट जामीनदार हे न्यायालयात येणार्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरुन त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असत.
त्यानंतर ही टोळी बनावट जामीनदार यांचे दुसर्या नावाने आधार कार्ड, रेशन कार्ड व ऑनलाईन ७/१२ वरील नावात बदल करुन ते कागदपत्रे तयार करत होते. रेशनकार्ड खरे वाटावे, म्हणून त्यावर पुरवठा विभागाचे उपायुक्तांचे रबरी स्टॅम्प मारुन खोटी सही करीत होते. त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करुन संबंधित सहायक अधीक्षक (नाझर) यांचेकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करुन खरे असल्याचे प्रमाणित करायचे.
न्यायालयासमक्ष जामीनदारांना हजर केल्यावर वकील व बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आव आणत आणि न्यायालयाची दिशाभूल करुन जेलमधील गुन्हेगारांना जामीन मिळवून देत असत. वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला पोलिसांच्या या बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत गोपनीय माहिती मिळाली.
त्या आधारे ४ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशाने लष्कर कोर्ट आवारात सापळा लावण्यात आला. संतोषकुमार शंकर तेलंग याच्यासह ५ बनावट जामीनदार ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांचा साथीदार व मुख्य सुत्रधार फरहान ऊर्फ बबलु शेख (रा. वैदवाडी, हडपसर) हा गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली.
या गुन्ह्याचा तपास करताना अटक केलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरुन मुख्य आरोपी फरहान शेख याला बनावट व चोरुन रबरी शिक्के तयार करुन देणारा दर्शन अशोक शहा (वय ४५, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) या दुकानदाराला अटक केली.
त्याच्याकडून ९ रबरी स्टॅम्प व मशीन जप्त केली. एकेरी पानाचे रेशन कार्ड प्राप्त करुन देणारे पिराजी ऊर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (वय ६०, रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली) आणि गोपाळ पुंडलीक कांगणे (वय ३५, रा. मोरवाडी, पिंपरी) याला अटक केली.
आरोपींनी संगनमत करुन त्यांचे स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. आतापर्यंत त्यांच्या ताब्यातून व घरझडतीतून एकूण ८९ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित आधार कार्ड, इतर कागदपत्रे, मोबाईल, मोपेड असा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडून जप्त केलेले बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड याद्वारे न्यायालयातून कोणकोणत्या आरोपींना आजपर्यंत जामीन मिळाला व त्याकामी आरोपींना कोणी कोणी मदत केली. याची माहिती न्यायालयाकडून प्राप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये न्यायालयातील काही वकिलांचा व कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात दोघा वकिलांना अटक केली आहे.
वानवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनाजी टाणे पुढील तपास करत आहेत.