आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मेट्रोमनीवरील ओळखीतून फसवणूक करणाऱ्यास इंदौरहून अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Police, Social • February 7, 2025
Spread the love

पुणे : मेट्रोमनी साईटवरून महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत, विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये हडप करणाऱ्यास काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदौर येथून अटक केली.

अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जि. जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी तरुणीची अमन वर्मा याच्याशी मेट्रोमनी साईटवर ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले व तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर, विविध कारणे सांगून फिर्यादीकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात सुमारे ४५ लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्याने फिर्यादीसोबत लग्न न करता तिची फसवणूक केल्याची तक्रार काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

तपासात, अमन वर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. तो सोशल मीडियावर किंवा मेट्रोमनी साईटवर बनावट ओळखी तयार करून महिलांशी मैत्री करत असे. जवळीक वाढवून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढून मोठ्या रकमा हडपण्याचा त्याचा प्रकार होता. त्याच्याविरुद्ध दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदौर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्ह्याच्या तपासात बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी इंदौर येथे असल्याचे समजले. तांत्रिक तपास करून काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने इंदौर येथे जाऊन त्याला अटक केली. न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, पोलीस हवालदार युवराज दुधाळ, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले यांच्या पथकाने केली आहे.