सायबर गुन्ह्यांत वाढ : मोबाईल आणि इंटरनेट कारणीभूत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांपैकी निम्मे गुन्हे हे तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होत आहेत. तुमची एक चूक सायबर चोरट्यांना संधी देऊ शकते. त्यामुळे अनोळखी लिंक, फोटो, व्हिडिओ क्लिक करू नयेत, तसेच इंटरनेटचा वापर मर्यादित करावा, असा सल्ला सायबर तज्ज्ञ व सीए शिरीष देशपांडे यांनी दिला.
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीने स्व. नलीनचंद्र फुलचंद गांधी यांच्या ३०व्या स्मृतीदिनानिमित्त सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सीए शिरीष देशपांडे आणि ट्रस्टचे विश्वस्त चकोर गांधी यांच्या हस्ते तनिष गांधी यांना सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोर्डिंगचे अधिक्षक सुरेंद्र गांधी, अनुराधा गांधी उपस्थित होते.
कार्यक्रमात जय कोचर, संकेत शहा, सिद्धांत शहा, ऋषी कर्नावट, मोहित कासलीवाल, प्रतीक देसाणी, समर्थ जैन, समय गंगवाल, ओम बोकाडिया, यश सुराणा, अरिंदम जैन यांच्यासह निवड समितीचे सदस्य आनंद कांकरिया व महावीर चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धती समजावून सांगताना देशपांडे यांनी ऑनलाइन बँकिंग व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमात अधिक्षक सुरेंद्र गांधी म्हणाले, “एचएनडी हा आता केवळ देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध ब्रँड झाला आहे.
येथील विद्यार्थी संस्कार आणि नेतृत्वगुण आत्मसात करून बाहेर पडतात आणि प्रेमापोटी दरवर्षी या कार्यक्रमाला हजेरी लावतात. या बोर्डिंगने अनेक अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि उद्योजक घडवले आहेत.”
चकोर गांधी म्हणाले, “बोर्डिंगची खरी ओळख येथे घडणाऱ्या छात्रांमुळे आहे. गेल्या ४२ वर्षांत सुरेंद्र गांधी यांनी केवळ अधिक्षक म्हणून नव्हे, तर हजारो विद्यार्थ्यांचे आई-वडिल म्हणून संस्कारक्षम घडवणारे मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.”
तनिष गांधी म्हणाले, “बोर्डिंगने मला संस्कार, नेतृत्वगुण आणि व्यासपीठावरील धाडस शिकवले. सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. यशाच्या शिखरावर पोहोचताना हा पुरस्कार मला प्रेरणा आणि जबाबदारीची जाणीव करून देईल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समय गंगवाल आणि अरिंदम जैन यांनी केले.
