धाराशिव जिल्हा अधिकारी व कर्मचारी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भूम तालुक्याचा झेंडा फडकला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : धाराशिव जिल्हाधिकारी व कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा २९ व ३० जानेवारी तसेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये भूम तालुक्याने विविध क्रीडा आणि सांस्कृतिक प्रकारांत उज्ज्वल यश संपादन करून आपला ठसा उमटवला.
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी निवड झालेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हाडोंगरी येथील शिक्षक रविकिरण भोजने यांनी आपल्या निवडीचे सार्थक केले. त्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक गीतगायन प्रकारात ‘जब वी मेट’ चित्रपटातील “आओगे जब तुम साजना, अंगना फुल खिलेंगे” हे गीत सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.
धाराशिव जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ आणि परीक्षक मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी व मानपत्र देऊन रविकिरण भोजने यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे भूम तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून तालुक्याचा अभिमान उंचावला आहे, असे गौरवोद्गार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भट्टी यांनी काढले.
या यशानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी रविकिरण भोजने यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
