आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीतील व्यापारी पवन श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळला

Spread the love

बार्शी : शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. ८ कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणार्‍या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे. अपहरणाचा डाव रचणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण फरार आहेत.

आकाश कानु बरडे (रा. परांडा रोड, बार्शी), प्रथमेश उमेश वळामे (रा. नेवाळे वस्ती, चिखली), नवनाथ विकास साळुंखे (रा. रेणापूर, ता. रेणापूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणाचा सुत्रधार अजिंक्य टोणपे (रा. रासे भोसे, चाकण), दक्ष पांडे (रा. मोरे वस्ती, साने चौक, पुणे) हे दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबतची माहिती अशी, पवन श्रीश्रीमाळ यांना १२ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजता एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला.

शेंगदाण्याच्या व्यापार्‍याच्या बहाण्याने त्यांना भेटायला एके ठिकाणी बोलविण्यात आले. परंतु, त्यांनी मी असे व्यवहार रस्त्यावर करत नाही. तुम्ही माझ्या दुकानीच या, असे सांगितले. त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या क्रमांकावरुन त्यांना फोन येत होते.

परंतु, त्यांनी कोठेही भेटायचा येण्यास नकार दिला. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बालाजी कॉलनी येथील घरी दोघे जण एमएससीबीचे कर्मचारी असल्याचे सांगून लाईट मीटर तपासण्याचा बहाणा करुन घरात शिरले.

पवन यांची त्यांनी चौकशी केली. ते घरात नाही हे समजल्यावर ते निघून गेले. या घटनेबाबत त्यांच्या मित्रांना संशय आल्याने त्यांनी सतर्कता दाखवत ते दोघे जण ज्या मारुती स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते.

त्या गाडीचा नंबर घेऊन ठेवला. या गाडीचा नंबर पोलिसांना देण्यात आला. ही गाडी आकाश बरडे याने भाड्याने घेतल्याचे समोर आले. आकाश बरडे हा एका किराणा दुकानामध्ये कामाला होता. त्यामुळे फिर्यादी पवन श्रीश्रीमाळ हे त्याला गेल्या तीन वर्षांपासून ओळखत होते.

आकाश बरडे व त्याच्या दोन साथीदारांकडे चौकशी केल्यानंतर एका मोठा कट उघडकीस आला. पुण्यातील अजिंक्य टोणपे, दक्ष पांडे, प्रथमेश वळामे आणि नवनाथ साळुंखे यांनी संगनमत करुन पवन श्रीश्रीमाळ यांचे अपहरण करुन खंडणी मागण्याचा व पैसे मिळाल्यावर त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याचे समोर आले.

या टोळीने गेल्या एक महिन्यापासून श्रीश्रीमाळ यांच्या हालचालींचे निरीक्षण केले होते. त्यांचे रोजचे वेळापत्रक, प्रवासाचे मार्ग, व्यवसायिक व्यवहार यांचा अभ्यास करून अपहरणाची संधी शोधत होते.

टोळीकडे मफलर, वायर, चाकू यांसारखी हत्यारे सापडली आहेत. या कटानुसार श्रीश्रीमाळ यांचे अपहरण करून 8 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आणि त्यानंतर त्यांचा खून करण्याचा डाव होता.

मात्र, श्रीश्रीमाळ यांची सतर्कता आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे हा कट उधळला. या प्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून, मास्टरमाइंड अजिंक्य टोणपे आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

बार्शीतील व्यापारी आणि नागरिकांनी सावधान राहावे, कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.