सिनिअर अकाउंटंट आणि सेल्स एक्झिक्युटिव्हचे संगनमत : रोख रक्कम स्वीकारून बनावट नोंदीद्वारे फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ग्राहकांकडून आलेल्या पैशांची नोंद करताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याचे अधिकार कंपनीने सिनिअर अकाउंटंटला दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करून त्याने सेल्स एक्झिक्युटिव्हच्या मदतीने फसवणूक केली. ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून ती बँकेत जमा केल्याची बनावट नोंद सॉफ्टवेअर प्रणालीत केली. बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करून दोघांनी मिळून बिस्लेरी कंपनीला ५० लाख ३० हजार ९७० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला अकाउंट प्रमुखाला संशय आल्याने चौकशी सुरू करण्यात आली आणि हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.
याबाबत बिस्लेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीच्या विभागीय शाखेचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक रवी श्रीकांत जहागीरदार (वय ३९, रा. नर्हेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, कंपनीतील तत्कालीन सिनिअर अकाउंटंट अजय अशोक मोरे (रा. आनंदनगर, सिंहगड रोड) आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह सचिन नामदेव धोत्रे (रा. दिघी, पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १४ मे ते २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान बिस्लेरी कंपनीच्या वडगाव बुद्रुक येथील विभागीय कार्यालयात घडला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय मोरे डिसेंबर २०१२ पासून सिनिअर अकाउंटंट पदावर कार्यरत होता, तर सचिन धोत्रे १४ सप्टेंबर २०१८ रोजी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नियुक्त झाला.
अजय मोरे याच्याकडे कंपनीच्या बँक खात्यात ग्राहकांकडून आलेली रक्कम नोंदवण्याचे व आवश्यक दुरुस्ती करण्याचे अधिकार होते. तसेच सचिन धोत्रे याच्याकडे ग्राहकांशी संपर्क ठेवून विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी होती.
नोव्हेंबर २०२४ मध्ये कंपनीच्या अकाउंट प्रमुख रेश्मा रायकर यांच्या निदर्शनास आले की, २३ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या प्रणालीत ५४ लाख ७१ हजार ८४० रुपयांच्या रिव्हर्स एंट्रीज करण्यात आल्या होत्या.
त्यांनी ही बाब इंदूर येथील सिनिअर अकाउंट मॅनेजर विनय अग्रवाल यांना कळवली. दोघांनी मिळून तपास केला असता, २६ नोव्हेंबर रोजी अजय मोरे सुट्टीवर असताना सकाळी ७ लाख ९२ हजार ४७० रुपयांच्या खोट्या नोंदी करण्यात आल्याचे आढळून आले.
वरिष्ठ स्तरावर चौकशी केली असता, अजय मोरे आणि सचिन धोत्रे यांनी संगनमत करून न्यू माई वडेवाले (नाशिक रोड), साई वडेवाले (खेड), शेतकरी फार्म (खेड), सागर हॉटेल (राजगुरूनगर), राणवरा हॉटेल (आणे), श्रेया एंटरप्रायझेस (दिघी), ए जे एंटरप्रायझेस (भोसरी) व इतर ग्राहकांकडून बिस्लेरी ड्रिंकिंग वॉटरची विक्री करून ५० लाख ३० हजार ९७० रुपये रोख स्वरूपात घेतले.
ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा केल्याचा खोटा दाखला सॉफ्टवेअर प्रणालीत तयार करण्यात आला. बँक खात्यातील शिल्लक आणि प्रणालीतील नोंदी जुळण्यासाठी रिव्हर्स एंट्रीचा गैरवापर करून बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करण्यात आले. त्यामुळे कंपनीची मोठी फसवणूक झाली. सध्या पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
