वीज, गॅस नंतर आता पाणी कनेक्शन कट करण्याचा मेसेज पाठवून सायबर फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “तुमचे बिल भरलेले नसल्याने आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन कट होणार आहे,” असा मेसेज “देवेश जोशी अधिकारी” या नावाने नागरिकांना पाठवला जात आहे. या मेसेजमध्ये एक मोबाईल नंबर दिला जातो. घाबरून नागरिक त्या क्रमांकावर संपर्क साधतात आणि आम्ही बिल भरले असल्याचे सांगतात. मात्र, संबंधित व्यक्ती त्यांना “तुमचे बिल अपडेट झालेले नाही,” असे सांगून एका लिंकवर माहिती टाकण्यास सांगते. नागरिक ती माहिती भरताच त्यांच्या बँक खात्यातील पैसे गायब होतात.
गेल्या दोन वर्षांपासून देशभरात देवेश जोशी या नावाने असे मेसेज पाठवून सायबर गुन्हेगारांनी हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. आधी वीज कनेक्शन, त्यानंतर गॅस कनेक्शन, आणि आता पाणी कनेक्शन कट करण्याची भीती दाखवून फसवणूक केली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या नावाने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
निगडी, यमुनानगर येथील ७६ वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना चालू महिन्याचे पाणी बिल अपडेट नसल्याचा मेसेज आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कनेक्शन कट होणार असल्याची भीती त्या मेसेजमध्ये दाखवली होती. त्यात “दिवेश जोशी” यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते.
फिर्यादींनी संपर्क साधल्यानंतर त्याने स्वतःला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच, हा मेसेज महापालिकेकडून पाठवला असल्याचा बनाव केला. भरलेले पाणी बिल अपडेट करण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत लोगोचा वापर करून “पीसीएमसी वॉटर बिल अपडेट” असे प्रोफाइल असलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवरून त्यांना “पाईपलाईन वॉटर अपडेट. APK” नावाची फाईल पाठवली. ही फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले. फिर्यादींनी ती फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ६५ हजार ५०९ रुपये काढले गेले.
महापालिकेचा लोगो स्टेटसला ठेवून मोबाईलधारक बोलत असल्याने लोकांना संबंधित व्यक्ती महापालिकेतूनच बोलत असल्याचा समज होतो. त्यामुळे अनेकांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम लुबाडली गेली आहे.
आधी अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वीज आणि गॅस बिलाच्या संदर्भात होत होत्या. मात्र, आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नावानेही फसवणूक होत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
सतत येणाऱ्या फसवणुकीच्या मेसेजमुळे नागरिक चौकशीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात जात आहेत. मात्र, तेथे गेल्यावर महापालिकेने कोणतेही असे मेसेज पाठवले नसल्याचे स्पष्ट होते. ही फसवणूक सायबर गुन्हेगारांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी दररोज महापालिकेत जाऊन चौकशी केली आहे.
संबंधित विभागाकडून अधिकृतरीत्या संपर्क केल्याशिवाय कोणत्याही लिंकवर माहिती भरू नये. संशयास्पद मेसेज आल्यास संबंधित संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. तसेच, अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.
