आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गंगाधाम उड्डाणपुलाचा वाद चिघळला

Spread the love

पुणे : बिबवेवाडीतील गंगाधाम चौकात नियोजित उड्डाणपुलाच्या दिशाबदलावरून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे.

आता या प्रकरणावर पुणे महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि एका राजकीय नेत्याने “नाव न सांगण्याच्या अटीवर” मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, उड्डाणपूल जर आईमाता मंदिर ते मार्केटयार्ड बस स्टॉपपर्यंत करण्याचा प्रयत्न केला असता, तर जागेच्या अभावामुळे तो शक्य झाला नसता.

मात्र, हा पूल जर पोस्ट ऑफिस चौकापर्यंत नेला असता, तर वाहतूक कोंडी दूर होऊन व्यापाऱ्यांचीही गैरसोय झाली नसती. प्रशासनाच्या या भूमिकेवर नागरिक आणि व्यापारी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

अनेकांनी असा आरोप केला आहे की, या उड्डाणपुलाचा मूळ उद्देश वाहतूक सुरळीत करणे हा असताना, तो चुकीच्या ठिकाणी वळवला जात आहे. वास्तविक, मार्केटयार्ड ते कात्रज-कोंढवा मार्ग हा अतिशय गजबजलेला आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. येथे उड्डाणपूल उभारल्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता.

मात्र, हा पूल बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवला जात आहे, जिथे त्याची तितकीशी गरजच नाही. त्यामुळे नागरिकांचे कररूपी कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत, असा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनांनी या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

“उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी बांधल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही, उलट ती अधिक वाढेल. त्याचबरोबर सार्वजनिक पैशांची नासाडी होईल,” अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, “या बदललेल्या योजनेमुळे दोन्ही मार्गांचा विचार करण्यात आला आहे.

नागरिकांच्या मागण्या ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल.” मात्र, हा खुलासा झाल्यानंतर प्रशासनाचा हा दावा फोल ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गंगाधाम उड्डाणपूल वाद अधिक चिघळत चालला आहे. प्रशासनाने वेळेत योग्य तो निर्णय न घेतल्यास, या प्रकरणाचा व्यापक विरोध आणि आंदोलन होण्याची शक्यता आहे.