खून करून पुरलेल्या प्रेताचा आणि आरोपीचा पोलिसांनी लावला छडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या दक्षतेमुळे एका गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावण्यात यश आले आहे. बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथे खून करून पुरलेले प्रेत आढळल्यानंतर पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपींना अटक केली आहे.
गुन्हा क्रमांक ५५/२५ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान वेगवेगळ्या पथकांनी परिसरात सखोल चौकशी केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभुळगाव येथील सालगडी राहूल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपींनी सुरेश रंगनाथ शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख पैशांसाठी कट रचून त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी प्रेत नितीन शिंदे यांच्या शेतात पुरल्याचेही उघड झाले. तांत्रिक तपासाद्वारे देखील या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला.
सदर आरोपींना अटक करून त्यांना बार्शी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. सोनवणे यांनी बाजू मांडली.
तपासादरम्यान आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता असून, पुढील चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे, अभय उंदरे, धनराज केकाण, सागर शेंडगे, राहूल बोंदर, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले.
तसेच बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, एएसआय अजित वरपे, हवालदार धनराज फत्तेपूरे, रतन जाधव आणि सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांचाही तपासात मोलाचा वाटा होता.
बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या या जलद आणि काटेकोर तपास कार्यामुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात मोठे यश आले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांनी संपूर्ण तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
बार्शी तालुका पोलिसांची ही तत्परता आणि निष्पक्ष कारवाई कौतुकास्पद असून, त्यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे.
