एमएनजीएलकडून बस प्रदान सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) कडून संस्थेस बस प्रदान करण्यात आली. या बसच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
समारंभात बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. विशेषत: मुलींच्या उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शुल्कात सवलती दिल्या आहेत.
खडकी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून भविष्यात आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांसाठी मी कायम मदतीसाठी तत्पर राहीन.” संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संस्थेच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणामुळे शिक्षण सोडावे लागू नये, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एमएनजीएलच्या सहकार्याने बस प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, एमएनजीएलच्या ऋतुजा पायगुडे, केसीबीचे उपाध्यक्ष अभय सावंत, सचिव आनंद छाजेड, अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर फेंगसे, कमलेश पंगूडवाले, राजेंद्र भुतडा, काशिनाथ देवधर, संजय चाकणे यांच्यासह संस्थेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुग्रीव सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद छाजेड यांनी व्यक्त केले.
