चित्रपट निर्मात्याने १० जणांना घातला १८ लाखांना गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करुन त्यांना ६५० शिक्षकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे सब कॉन्ट्रँक्ट देण्याचे आमिष दाखवून त्यांना एका निर्मात्याने १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बिबवेवाडी येथील एका ५४ वर्षांच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हिरेन वैद्य (वय ४५, रा. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार स्वारगेट येथील कुमार पॅसिफिक मॉल येथे मे २०२४ ते २० जून २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ग्रीन कॉरिडोर या मराठी चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्या सिनेमाचा मुहूर्त होता. पण त्या जाऊ शकल्या नाहीत.
त्यानंतर सिनेमाचे हिशोब व कलाकाराची निवड पाहणारे हिरेन वैद्य याची एका महिलेमार्फत ओळख झाली. काही कारणाने ग्रीन कॉरीडोर या चित्रपटातून त्यांना वगळले. पुढील चित्रपटाचे पुण्यात शुटींग करणार आहे.
तेव्हा तुम्हा दोघींना घेईन, असे हिरेन वैद्य याने सांगितले. त्यानंतर मे २०२४ मध्ये हिरेन वैद्य कुमार पॅसिफिक मॉल येथे आला. या ठिकाणी पुढील सिनेमाबाबत चर्चा व कलाकारांची निवड याबाबत चर्चा करत होता.
ही चर्चा एक महिना त्या ठिकाणी चालल. या ठिकाणी फिर्यादी, हिरेन वैद्य व इतर छोटे मोठे कलाकार व लेखक येत असे. या चर्चेदरम्यान त्याने फिर्यादी यांना सांगितले की, केंद्र सरकारचे एक शिक्षा अभियान याच्या अंतर्गत सर्व्हेसाठी आलेल्या ६५० शिक्षक कर्मचारी यांना दिवसांतून दोन वेळा सासवड विभागात जेवणाचे डब्बे पुरविण्याचे कॉन्टॅक्ट मिळाले आहे.
हिरेन वैद्य याने त्याचे सब कॉंन्टॅक्ट तुम्हाला देतो, असे सांगितले.एका वेळच्या जेवणाच्या डब्ब्याचा दर १२० रुपये. त्यापैकी प्रत्येकी २० रुपये हिरेन वैद्यला व प्रत्येकी १० रुपये फिर्यादी यांना देण्याचे ठरले. त्यासाठी हिरेन वैद्य याला फिर्यादी यांनी ८० हजार रुपये कुमार पॅसिफिक मॉल येथे दिले.
बाकीचे ८० हजार मी टाकतो, असे हिरेन वैद्य याने सांगितले. या सब कॉन्टॅक्टचे फिर्यादी यांनी त्यांच्या मैत्रिणी, चुलत भाऊ यांना सांगितले. त्यांनाही हिरेन वैद्य याने सब कॉन्टॅक्ट देण्याचे कबुल करुन त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये घेतले.
अशा प्रकारे हिरेन वैद्य याने सब कॉन्टॅक्ट देतो, असे सांगून वेगवेगळ्या लोकांकडून १ लाख २० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले. त्यांना त्याने पैसे घेतल्याचे नोटरी करुन दिले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने दिल्लीला या कामाकरीता जातो, असे सांगून गेला.
त्याने सर्वांना २४ जून २०२४ रोजी फोन करुन १ जुले पासून आपले काम सुरु करु असे सांगितले. त्याचा हा शेवटचा फोन ठरला. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर त्याने कोणाशीही संपर्क साधला नाही.
१० जणांची १८ लाख रुपयांची फसवणूक करुन हिरेन वैद्य पसार झाला. त्यांनी काही दिवस त्याची वाट पाहिली. कोल्हापूर येथील घर शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कोठेच सापडला नाही. हा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
