ज्येष्ठ नागरिकाला ३८ लाखांचा गंडा : कर्वेनगरमधील भामट्यावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गोंदवले महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला गोतुल्य डेअरी फार्मच्या प्रॉडक्टची डिलरशीप मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३८ लाख ९७ हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत फुरसुंगी येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुबोध विश्वनाथ शिरोडकर (रा. कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील संकल्प सोसायटीत १६ मे २०२४ ते आजपर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मुलासाठी व्यवसाय सुरू करण्याच्या शोधात होते. १४ मे २०२४ रोजी गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनासाठी गेल्यानंतर, भक्तनिवासात त्यांची सुबोध शिरोडकर यांच्याशी ओळख झाली.
गोड बोलून शिरोडकर यांनी फिर्यादीची सर्व माहिती मिळवली. त्यांनी स्वतःची ओळख अहिल्यानगर येथील गोतुल्य डेअरी फार्ममध्ये बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून करून दिली. त्यांनी फिर्यादी यांच्या मुलाला गोतुल्य डेअरी फार्मच्या प्रॉडक्टची डिलरशीप मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच काही देवस्थानांकडून तुपाच्या ऑर्डर असल्याचे सांगितले. त्या ऑर्डर त्यांच्या माध्यमातून पाठवल्यास त्यांना नफा मिळेल, असेही सांगण्यात आले. शिरोडकर यांनी कोलकाता येथील रामकृष्ण परमहंस मठाची १ लाख ५ हजार रुपयांच्या ऑर्डरचा पेपर दाखवला आणि एक महिन्यानंतर त्यावर १५ हजार रुपये नफा मिळेल, असे सांगितले.
त्यानंतर, पैसे देण्यापूर्वीच, १ लाख २० हजार रुपयांचा चेक श्री गोंदवलेकर महाराज समाधीवर ठेवून तो फिर्यादींना सुपूर्त केला. अशा प्रकारे त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यानंतर फिर्यादींनी गुगल पेद्वारे शिरोडकर यांच्या खात्यात १ लाख रुपये पाठवले.
त्यानंतर ते शिरोडकर यांना त्यांच्या कर्वेनगरमधील संकल्प सोसायटीतील कार्यालयात भेटत असत. शिरोडकर यांनी राजस्थानातील अलवर येथील एएमआर इलेक्ट्रिकल स्कूटर्सची ऑर्डर दाखवून तुपाच्या पॅकेट्स पोहोचवायचे असल्याचे सांगत १ लाख ८२ हजार रुपये घेतले.
त्याबदल्यात त्यांनी केवळ २८ हजार रुपये नफा म्हणून दिले, मात्र मूळ मुद्दल परत दिले नाही. या प्रकारानंतर, वेगवेगळ्या ठिकाणच्या बनावट ऑर्डर दाखवून फिर्यादींकडून पैसे घेतले गेले. नंतर गोतुल्य डेअरीने छोटे पॅकिंगची ऑर्डर औरंगाबाद येथील वृंदावन डेअरीला दिल्याचे सांगण्यात आले.
वृंदावन डेअरीच्या डिलरशीपसाठी तुप मागविण्याच्या बहाण्यानेही त्यांनी पैसे घेतले. शेवटी, शिरोडकर यांनी कर्वेनगरमधील कार्यालय बंद करून पळ काढला. अशा प्रकारे, तुपाची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने सुबोध शिरोडकर यांनी ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ३८ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे करत आहेत.
