आठ दिवसांच्या मुक्कामानंतर नगर प्रदक्षिणेसह भाविकांचा उत्स्फूर्त निरोप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे २८ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी संत सद्गुरू बाळू मामांच्या पालखीचे आगमन झाले होते. आठ दिवसांचा मुक्काम आटोपून ८ मार्च रोजी नवव्या दिवशी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात नगर प्रदक्षिणा काढून पालखीला निरोप दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथून निघालेल्या श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या पालखी (बग्गा क्र. ०९) चे आगमन २८ फेब्रुवारी रोजी पारगाव येथे झाले. या पालखी सोबत बाळू मामा यांच्या मेंढ्यांचाही समावेश होता.
दररोज या मेंढ्या पारगाव व परिसरातील शिवारात चारा खाण्यासाठी जात होत्या. पालखी मुक्कामस्थळी सकाळी व संध्याकाळी बाळू मामांच्या आरतीचे आयोजन केले जात असे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन हजारो भाविक पंगतीमध्ये सहभागी होत होते. आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते.
या सोहळ्यात पारगाव, पिंपळगाव (क.), जनकापूर, हातोला, रुई, लोणखस या गावांतील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. रात्री आरतीनंतर हरिकीर्तनाचे आयोजन होत होते, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
८ मार्च रोजी नवव्या दिवशी पालखी पुढील मुक्कामासाठी वाशी तालुक्यातील शेंडी शिवाराकडे रवाना झाली. प्रस्थानावेळी पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. या मिरवणुकीत दोन डी.जे., एक बँड, टाळ-मृदंगांच्या गजरात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.
महिला भाविकांनीही भक्तिरसात तल्लीन होत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. पारगाव व जनकापूर गावांतील प्रत्येक घरातील कुटुंबीयांनी पालखीला निरोप देण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सोहळ्यात गावातील सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रातील युवक, नागरिक तसेच महिला व तरुणींचा उल्लेखनीय सहभाग होता.
पालखी पुढील मुक्कामासाठी शेंडी शिवारातील ग्रामस्थ स्वागतासाठी उपस्थित होते. भाविकांच्या भक्तिभावाने भारलेला हा सोहळा, पारगावकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
