गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी : खुनाच्या प्रयत्नाचे २ गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, अभिनव कॉलेजजवळ, नर्हे; मूळ रा. डीएसके पायथा, धायरी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सागर सोनलकर याच्यावर शिरूर पोलीस ठाणे आणि हवेली पोलीस ठाणे येथे खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो धायरी येथे राहत होता. सध्या तो नर्हे येथे राहत आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार आरोपी यांची तपासणी करून कारवाई करत होते. यावेळी पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुनला आणि योगेश झेंडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर सोनलकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला अटक करून अधिक तपासासाठी त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता घरात आणखी दोन गावठी पिस्टल आढळून आली.
पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याला पुढील तपासासाठी नर्हे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे अधिक तपास करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुनला आणि योगेश झेंडे यांनी केली.
















