गुंडाने त्याच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यापूर्वीच त्याचा खातमा करण्याचा आखला होता कट
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून ऑक्टोबर २०२४ मध्ये पर्वती पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जखमी झालेला गुंड त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, असे वाटल्याने त्याला बदला घेण्याआधीच संपविण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी गुन्हेगाराला पिस्तूलही पुरविण्यात आले होते. खंडणीविरोधी पथकाला याची कुणकुण लागली. त्यांनी संबंधित गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य खुनाची घटना टळली असून पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दांडेकर पूल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासोबत खुनाचा कट रचणारे सिंधु धोत्रे ऊर्फ आक्का, अमन झरेकर याची आई सिन्नु झरेकर, गणेश रेणुसे याची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रोड, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अप्पर बिबवेवाडी), बापू कांबळे (रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याला जखमी करण्यात आले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात गणेश रेणुसे, आकाश म्हस्के, तेजस नायर, रोहित खडके, भैय्या पालखे व इतर चार आरोपींचा समावेश आहे. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यातील गणेश रेणुसे सध्या जामिनावर बाहेर आहे.
संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे हा त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, अशी भीती गणेश रेणुसे यांच्या नातेवाईकांना होती. त्यामुळे संतोष साळुंखे याने गणेशवर हल्ला करण्यापूर्वीच संतोषचा खून करण्याच्या उद्देशाने त्यांनी पिस्तूल मिळवले. ते चेतन जाधव याला देण्यात आले होते.
गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार सचिन माळवे व अमर पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून ही माहिती मिळाली.
या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून दांडेकर पूल परिसरातील मांगीरबाबा चौक येथून चेतन जाधव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व त्याच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे असा ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, गणेश रेणुसे नुकताच मोक्का गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे. भावड्या साळुंखे याचा प्रभाव दांडेकर पूल परिसरात वाढला आहे. त्यामुळे तो गणेश रेणुसेवर हल्ला करण्याची शक्यता होती. म्हणून गणेश रेणुसे यांच्या नातेवाईकांनी भावड्याचा खून करण्याचे ठरवले होते.
तसेच सिंधु ऊर्फ आक्का धोत्रे हिचा मुलगा सचिन धोत्रे याची सात वर्षे पत्नी असलेल्या महिलेबरोबर भावड्या साळुंखे याचे अनैतिक संबंध होते व त्यांच्यापासून तिला दोन मुले झाली होती. त्यामुळे परिसरात नाचक्की झाली होती. त्याचा बदला सिंधुचा दुसरा मुलगा अमित धोत्रे घेणार होता. मात्र त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचा आरोपींचा मानस होता, असे त्याने सांगितले.
त्यासाठी त्यांनी पिस्तूल उपलब्ध करून दिले होते. स्वतः वेगळे राहून एका सराईत गुन्हेगाराच्या मदतीने भावड्याचा खून घडवून आणण्याचे ठरवले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्याला ठरलेली रक्कम देण्याचेही निश्चित करण्यात आले होते. खंडणीविरोधी पथकाने वेळेत कारवाई करून हा खुनाचा कट उधळला आणि संभाव्य रक्तपात टाळला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, अमोल आवाड, अमर पवार, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, रहिम शेख, रणजित फडतरे, प्रफुल्ल चव्हाण व राजेंद्र लांडगे यांनी केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, वाहन तोडफोड व आर्म अॅक्टचे दोन गुन्हे दाखल आहेत. अमन झरेकर याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अॅक्टचे पाच गुन्हे आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. गणेश दीपक रेणुसे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात जबरी चोरी तसेच पर्वती येथे खुनाचा प्रयत्न आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बापू शिवाजी कांबळे याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा एक व दारुविक्रीचा एक गुन्हा दाखल आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात बापू कांबळे याला २०१४ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो २०२३ पासून उच्च न्यायालयातील अपीलावर जामिनावर बाहेर आहे. सिंधु हिरामण धोत्रे हिच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार तीन गुन्हे दाखल आहेत.
















