११ लाख ३५ हजारांची फसवणूक; शुक्रवार पेठेतील घटना
पुणे : क्रीडा साहित्याची फ्रँचायझी व ग्राहक मिळवून देतो, असे आमिष दाखवून भामट्यांनी विश्वास संपादन करून ११ लाख ३५ हजार २५० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी जैनम राजेश शहा (वय २८, रा. शुक्रवार पेठ, शिंदे आळी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इन्स्टाग्रामवर ब्राउझ करत असताना त्यांना क्रीडा साहित्य फ्रँचायझीबाबत एक जाहिरात दिसली.
‘गेमोली टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ नावाच्या कंपनीने दरमहा ३०,००० रुपये उत्पन्न आणि ग्राहक मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांनी कंपनीच्या फ्रँचायझी मॅनेजर जय यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर कंपनीने आवश्यक कागदपत्रे कुरिअरद्वारे पाठवली आणि फ्रँचायझी मिळवण्यासाठी २ लाख रुपये भरण्यासाठी बँक खाते क्रमांक दिला.
यानंतर जय याने फिर्यादींना २८ ग्राहक मिळवून दिल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीचे मालक प्रणव तलाठी यांनी सर्व क्रीडा साहित्याच्या किंमती समजावून सांगितल्या. जय याने क्रीडा साहित्य पुरवठ्यासाठी करार पाठवला.
त्या करारानुसार, माल पाठवण्यासाठी ९ लाख ३५ हजार २५० रुपये भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादींनी हा रक्कम ऑनलाइन पद्धतीने पाठवली. मात्र, त्यानंतर त्यांनी जय मश्रु आणि प्रणव तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला.
परंतु, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आपण फसवले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सध्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
