गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून केली तोडफोड; फॉरेस्ट पार्कमधील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असताना, भर रस्त्यात लघुशंका करून माज दाखविणाऱ्या श्रीमंत बापाच्या दिवट्याच्या प्रकाराचा सर्वच पुणेकरांनी निषेध केला. अशा पार्श्वभूमीवर आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. तलवार नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रकारही समोर आला आहे.
याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी गोरखनाथ एकनाथ शिर्के (वय ६५, रा. फॉरेस्ट पार्क, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोविंद हनुमंत कॅनल, त्याची पत्नी, मयूर सकट (रा. येरवडा), राजू देवकर, कार्तिक राजू देवकर याची दोन मुले आणि येरवड्यातील आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता फॉरेस्ट पार्क येथे घडला. गोरखनाथ शिर्के हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी पुणे शहरातील बंडगार्डन, चतु:श्रृंगी आदी पोलीस ठाण्यांत सेवा बजावली आहे.
निवृत्तीनंतर त्यांनी फॉरेस्ट पार्क येथे स्वतःचे घर बांधले. त्यांची दोन मुले बाहेर भाड्याने राहतात. त्यामुळे त्यांनी घराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. फॉरेस्ट पार्कमधील रहिवाश्यांनी आपापल्या ऐपतीनुसार जमिनी घेत घरे बांधली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद कॅनल याच्याकडे हाऊसकिपिंगचे कंत्राट आहे. फॉरेस्ट पार्कमधील सार्वजनिक रस्त्यावर असलेल्या ड्रेनेजचे झाकण तुटले होते. शिर्के यांच्या घराजवळ येणाऱ्या वाहनांमुळे ते तुटल्याचा आरोप गोविंद कॅनल याने केला आणि त्याने शिर्के यांना ते दुरुस्त करण्याची मागणी केली.
मात्र, सोसायटीतील काही रहिवाशांच्या मते, हे झाकण आधीच तुटले होते. परंतु, गोविंद कॅनलच्या दहशतीमुळे कोणीही त्याच्या विरोधात बोलण्यास तयार नव्हते. शिर्के यांनी ड्रेनेजचे झाकण बदलण्यासाठी लागणारी रिंग आणून दिली होती.
तरीसुद्धा, संपूर्ण खर्च शिर्के यांनीच करावा, अशी गोविंद कॅनलची मागणी होती. यासाठीच तो आपल्या नातेवाईकांसह शिर्के यांच्या घरी आला. त्याने शिर्के यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर येरवड्यातील काही तरुणांना बोलावले. त्या तरुणांच्या मदतीने सर्वजण शिर्के यांच्या घरात घुसले.
गोविंद कॅनल याने तलवार हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि शिर्के यांना जीवे मारण्याची धमकी दिली. टोळक्याने घराच्या पार्किंगमधील खुर्च्या व कुंड्यांची तोडफोड केली तसेच घरातील सामानाचीही नासधूस केली. सध्या पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
