बुचड्या ससाणे : दांड्या आडागळेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोयत्याचा धाक दाखवून ‘‘आम्ही लोहियानगरचे डॉन’’ असे म्हणून किराणा दुकानाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोघा गुंडांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नदीम मेहमुद खान (वय २४, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिषेक ऊर्फ बुचड्या ससाणे (रा. लोहियानगर, सध्या रा. गुलटेकडी) आणि त्याचा मित्र विवेक आडागळे ऊर्फ दांड्या यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहियानगर पोलीस चौकीत जाऊन स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन बुचड्या ससाणे व त्याच्या नातेवाईकांनी राडा घातला होता़ खडक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणलयाचा आणखी एक गुन्हा दाखल करुन बुचड्या ससाणे याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम खान यांचे लोहियानगरमधील राम मंदिर गल्ली नंबर एक मध्ये किराणा दुकान आहे. ते १० मार्च रोजी रात्री ११ वाजता दुकान बंद करत असताना बुचड्या ससाणे व दांड्या आडागळे हे तेथे आले.
ससाणे त्यांना म्हणाला, ‘तु दुकान ऐवढ्या वेळेपर्यंत चालू ठेवतो, आम्हाला खंडणी म्हणून प्रत्येक आठवड्याला १२०० रुपये द्यायचे़ नाही तर तुला मारुन टाकील़’ अशी धमकी दिली. त्यावर नदीम हे त्याला बोलले की, कसले पैसे, तुला का द्यायचे, असे विचारले.
त्यावर तो दुचाकीमधील डिक्कीमधून कोयता काढून लागला. हे पाहून आजू बाजूचे १५ ते २० जण पळून गेले. त्यावेळी तो नदीम यांना म्हणाला, आम्हाला १२०० रुपये दे, नाही तर तुला आताच ठार मारेन, अशी धमकी दिली.
त्यावेळी त्यांचा मामे भाऊ देखील तुला कशाचे पैसे द्यायचे, असे बोलला़ त्यावर तो मोठ्याने ओरडुन ‘‘आम्ही लोहियानगरचे डॉन आहे. माझा भाऊ ललित ससाणे आहे, तो पोलिसांना कसे वाकवतो माहिती आहे ना तुम्हाला,’’ असे म्हणून मोठमोठ्याने ओरडून त्याने गाडीच्या डिक्कीतून कोयता बाहेर काढला.
ते पाहून नदीम यांनी घाबरुन त्याला १२०० रुपये दिले. त्यावेळी त्याने फिर्यादी व त्यांच्या मामेभावाला शिवीगाळ केली. ललित भाऊ व आम्हाला दर आठवड्याला हप्ता द्यायचा, असा दम देत दोघे मोठमोठ्याने ओरडून दहशत माजवुन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक भारत बोराडे तपास करीत आहेत.
