कोंढव्यातील प्रकार, फसवणुकीच्या पैशांमधुन खरेदी केला आय फोन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हैदराबादला जाणार्या पुण्यातील एका डॉक्टरला भाड्याने कार हवी होती. त्यासाठी त्याने इंटरनेटद्वारे कार बुक करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा सायबर चोरट्यांनी चुकीची लिंक पाठवून त्याद्वारे डॉक्टरांना ७९ हजार रुपयांना गंडा घातला. या पैशातून सायबर चोरट्यांनी बंगलुरु मधील दुकानातून आय फोन खरेदी केला आहे. याबाबत कोंढव्यातील ४६ वर्षाच्या डॉक्टराने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांना सहकुटुंब हैदराबाद येथे जायचे होते. हैदराबाद येथे उतरल्यानंतर एअर पोर्ट पासून दोन दिवस त्यांना भाड्याने कार हवी होती. कार ऑनलाईन भाडेतत्त्वावर मिळते का याचा ते इंटरनेटवर शोध घेत होते. यावेळी त्यांना tirupaticarrental.co.in या कंपनीची वेबसाईट दिसून आली.
वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा त्यांना सुरुवातीला. बुकींगसाठी १५० रुपये क्रेडिट कार्डद्वारे भरण्यास सांगितले. त्यावर त्यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे जात नव्हते. त्यांनी त्या वेबसाईटवरील नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करुन पैसे जात नसल्याबाबत सांगितले.
त्यांनी काय मेसेज येत आहे, याचा र्स्क्रिन शॉट पाठविण्यास सांगितले. त्यांनी मोबाईलचा स्क्रिन शॉट काढून पाठविल्यावर त्यांना तुम्ही चुकीची लिंक ओपन केली, असे सांगून त्यांना नवीन लिंक पाठविली. ती लिंक ओपन करुन संपूर्ण माहिती भरा व त्यावरच पैसे पाठवा असे सांगितले.
त्यानुसार त्याने पाठविलेली ajy-qbbj-fix लिंक ओपन करुन त्यावर डॉक्टरांनी क्रेडिट कार्ड व डेबीट कार्डची माहिती भरली. त्यानंतर तात्काळ त्यांच्या मोबाईलवर लगेचच पैसे कट होत असल्याचे मेसेज येऊ लागले. त्यांनी लगेच प्रोसेस थांबवून तात्काळ आपल्या बँकेला कळवून क्रेडिट कार्ड व डेबीट कार्डचे पेमेंट थांबवून मोबाईल स्विच बंद केला.
त्यांनी ऑनलाईन सायबर तक्रार केली. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून ७९ हजार २४७ रुपये काढण्यात आले होते. त्यांनी आपल्या तक्रारीचा पाठपुरावा केल्यावर लक्षात आले की त्यांच्या बँक खात्यातून लांबविण्यात आलेल्या पैशामधून बंगलुरु येथील पदमा टी एम याने आय फोन १६ खरेदी केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.
