वाहतूक शाखेने तब्बल १७६९ सायलेन्सर वर फिरवला रोड रोलर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रात्री-अपरात्री सायलेन्सर मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत जाणाऱ्या टवाळखोर बुलेटस्वारांवर वाहतूक शाखेने विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. तब्बल १७६८ बुलेट मॉडिफाइड सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. असे सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
दिवस-रात्र मोठ्या आवाजाने नागरिकांना त्रास देऊन असुरी आनंद मिळवणाऱ्या या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. सायलेन्सरमध्ये फेरफार करून किंवा नवीन मॉडिफाइड सायलेन्सर बसवून सार्वजनिक रस्त्यावर, रहिवासी भागात दिवसा-रात्री कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार तरुणांमध्ये वाढत होते.
या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता. याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे अशा बुलेटस्वारांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलेट मॉडिफाइड सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करून १७६८ मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले.
हे सर्व सायलेन्सर वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात जमा करण्यात आले. त्यानंतर ते एका रांगेत ठेवून त्यावर रोडरोलर फिरवण्यात आला. वाहतूक शाखेच्या सर्व विभागांकडून ही मोहिम राबविण्यात आली.
तसेच बुलेट सायलेन्सरच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून, सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
