विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध केला फसवणूकीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परदेशात फिरायला जाण्यासाठी डॉलरची गरज असलेल्या एका तरुणाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अरविंद सुरेश घाडगे (वय २८, रा. जयवंत कॉम्प्लेक्स, कळस) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रसन्न मंडावले, शिवम भोजने आणि राजेश म्हस्के (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना १३ मार्च रोजी पुणे-अहिल्यानगर रोडवरील विमाननगर येथील फोर पॉईंट हॉटेलसमोर घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी शेती व व्यापार करत असून ते शेअर मार्केटचा अभ्यास करत आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी कोल्हापूर येथे शेअर मार्केटच्या क्लासदरम्यान त्यांची प्रसन्न मंडावले याच्याशी ओळख झाली होती. परदेश प्रवासासाठी डॉलरची आवश्यकता असल्याने मंडावले याने त्यांना आपल्या ओळखीतील शिवम भोजने याच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले.
३ मार्चपासून मंडावले सातत्याने फोन करून करन्सी एक्सचेंज व्यवहाराबाबत संपर्क करत होता. १३ मार्च रोजी त्याने फिर्यादींना फोर पॉईंट हॉटेलसमोर बोलावले. तेथे शिवम भोजने हा त्यांच्या कारमध्ये बसून म्हणाला की, “आमचे सर प्रत्यक्ष व्यवहार करत नाहीत. तुम्ही मला रोख रक्कम दिल्यास १० ते १५ मिनिटांत डॉलर देतो.”
यावर विश्वास ठेवून फिर्यादींनी कारच्या डिक्कीत ठेवलेले ७ लाख ५० हजार रुपये भोजने याला दिले. त्यानंतर तो रिक्षाने निघून गेला. बराच वेळ वाट पाहूनही तो परत न आल्याने फिर्यादींनी मंडावले याच्याशी संपर्क साधला. मात्र त्याने टाळाटाळ केली.
तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर मंडावले याने राजेश म्हस्के याचे नाव घेऊ नका, असा सल्ला दिला. तिघांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाट करत आहेत.
















