‘स्वराज्याची ज्योत’ पुन्हा प्रज्वलित करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदीप्यमान कार्याचे महत्त्व तरुण पिढीला पटवून देण्यासाठी, शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिवोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ‘स्वराज्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा संकल्प’ (Reigniting the Spark of Swarajya) या मुख्य संकल्पनेवर आधारित या विशेष सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीमार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात सूर्यदत्त समूहाच्या सहाय्यक उपाध्यक्ष सौ. स्नेहल नवलाखा यांच्या हस्ते शिवआरती आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बन्सी रत्न ऑडिटोरियम आणि महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवरायांचे राजेशाही स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी दिलेल्या ‘शिवगर्जना’ घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला होता. महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेरणादायी पोवाडे आणि ओघवती भाषणे. ‘वीररस पोवाडा’ सादरीकरणातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि शौर्यगाथा जिवंत करण्यात आल्या.
विशेषतः, सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बांगुडे पाटील यांचे डिजिटल ‘शिव व्याख्यान’ प्रक्षेपित करण्यात आले, ज्यातून विद्यार्थ्यांना महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याची, दूरदृष्टीची आणि अष्टपैलू नेतृत्वाची नवी दृष्टी मिळाली. याप्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पारंपरिक नऊवारी साडी, फेटा आणि मराठमोळ्या पेहरावात नटलेल्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानिमित्त ‘बेस्ट ट्रेडिशनल ड्रेपरी’ स्पर्धा आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित कलात्मक पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा संपूर्ण सोहळा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका झांबड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. महोत्सवाचा समारोप दिमाखदार ‘ग्रँड फिनाले’ नृत्याने आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य विचारांच्या जपणुकीच्या सामूहिक निर्धाराने झाला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाची भावना जागृत झाली असून, शिवरायांनी घालून दिलेला शौर्य आणि सदाचाराचा वारसा आपल्या व्यावसायिक आयुष्यात पुढे नेण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. आभार प्रदर्शनाने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील महापुरुष नसून, ते ‘इफेक्टिव्ह मॅनेजमेंट’ आणि ‘व्हिजनरी लीडरशिप’चे जागतिक दीपस्तंभ आहेत. महाराजांचे विचार केवळ एका दिवसाच्या उत्सवापुरते मर्यादित न ठेवता ते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आचरणात यावेत, हाच आमचा उद्देश आहे. स्वराज्याची संकल्पना आणि महाराजांचे शौर्य आजच्या हेल्थकेअर क्षेत्रातील भविष्यातील ‘आरोग्य योद्ध्यांसाठी’ कायम मार्गदर्शक ठरेल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम आणि नेतृत्वाची नवी ठिणगी प्रज्वलित झाली आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

















