वैदुवाडीतील घटनेत खंडणी विरोधी पथकाने चौघा भावांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कबुतर चोरण्यासाठी आल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण केल्याने त्याला उलटी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खंडणी विरोधी पथकाने या तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघा भावांना अटक केली आहे.
गौरव विजयकुमार माजी (वय २२), सचिन विजयकुमार माजी (वय २३), मोनू विजयकुमार माजी (वय २६), बंटी विजयकुमार माजी (वय १८, सर्व रा. शंकर मठ, पवार इन्क्लेव्ह सोसायटी, वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रुपेश धनराज शिंदे (वय १९, रा. संजय गांधीनगर, बोराटे वस्ती, मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचे वडील धनराज शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १८ मार्च रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रुपेश शिंदे हा मित्राबरोबर मोशीला परत येत असताना लघुशंकेसाठी वैदुवाडी येथे थांबला होता.
त्यानंतर तो पुढे चालत कबुतरांच्या ढाबळीपर्यंत गेला होता. त्यावेळी त्याला चोर समजून मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. वैदुवाडी येथील कबुतरांच्या ढाबळी जवळ तरुण उभे असल्याचे दिसल्याने ते कबुतर चोरण्यासाठी आले असावेत, अशा संशयावरून पाच जणांनी लाकडी बॅटने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तरुणाला गंभीर जखमी केले.
त्याला उलटी होऊ लागल्याने त्यांनी अपघाताचा बनाव करून त्यास अॅम्ब्युलन्समधून ससून रुग्णालयात आणल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना कळविली.
त्यानंतर पोलीस अंमलदार राऊत व रोकडे हे ससून रुग्णालयात गेले. अॅम्ब्युलन्समधून आणलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजले. त्याला रुग्णालयात घेऊन येणाऱ्या तरुणांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, आमच्या घरासमोर आमची एक कबुतरांची ढाबळ आहे.
पहाटेच्या सुमारास कुत्री ओरडल्याने आम्ही बाहेर पाहिले असता त्या ढाबळी जवळ हा तरुण संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसले. कबुतर चोरण्यासाठी तो आला असावा, असे आम्हाला वाटल्याने आम्ही घरातील चार भाऊ व एक मित्र असे पाच जणांनी मिळून त्याला लाकडी बॅटने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला कबुतरांच्या ढाबळीला बांधून ठेवले.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो घाबरल्यासारखा करू लागल्याने त्याला ससून रुग्णालयात आणले. तेथे उलटी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन इतर मारहाण करणाऱ्या भावांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनीही अशीच हकीकत सांगितल्याने त्यांना अधिक तपासासाठी वानवडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ मुंढे, रविंद्र रोकडे, अमोल राऊत यांनी केली.















