गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 मार्च 2025 रोजी रात्री 11.30 वाजता दिग्विजय सोसायटी, आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिराच्या मागील रस्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारांची धिंड काढली.
फिर्यादी (वय 19 वर्षे) यास मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरून वाद होऊन आरोपींनी धारदार शस्त्राने गंभीर मारहाण केली होती. याप्रकरणी गणेश जाधव, विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोके आणि इतर अशा 20 ते 25 वयोगटातील सराईत गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली.
परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची धिंड
हे सर्व आरोपी कात्रज, संतोष नगर, सच्चाई माता चौक, भगवा चौक, हनुमान नगर, शनिनगर, जांभूळवाडी रोड आणि पाण्याची टाकी चौक परिसरात दहशत माजवत होते. वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर त्यांची धिंड परिसरातून काढण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या या ठोस कृतीचे कौतुक होत आहे.
“गुन्हेगारीचा मार्ग सोडून योग्य दिशा घ्या” – पोलिसांचे आवाहन
आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद झीने यांनी या कारवाईबाबत सांगितले की, “तरुणांनी चुकीच्या मार्गावर न जाता शिक्षण, क्रीडा आणि समाजकार्याकडे लक्ष द्यावे. गुन्हेगारी हा मार्ग शेवटी कारागृहात किंवा मृत्यूसारख्या विनाशाला घेऊन जातो. त्यामुळे युवकांनी चांगल्या मार्गावर चालत आपले भविष्य उज्ज्वल करावे.”
जनतेचा पोलिसांना पाठिंबा
आंबेगाव पोलिसांनी केलेल्या जलद आणि धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “अशा कठोर कारवायांमुळे गुन्हेगारांना जरब बसते आणि परिसरात शांतता निर्माण होते,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.आंबेगाव पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करत संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
