भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन मंडळांवर केले गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवजंयती उत्सव साजरा करताना कर्कश आवाजात लाऊड स्पिकरवर गाणी वाजवून ध्वनी प्रदुषण करणार्या तीन मंडळांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पी आय सी टी कॉलेजसमोरील जिवलग प्रतिष्ठान मित्र मंडळाचे अध्यक्ष निशांत हेमंत पवार (रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) आणि स्पिकरचालक तेजस विकास पवार (वय २४, रा. सांगवी, ता. बारामती), आंगण हॉटेलसमोरील शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्कार राहुल मांगडे, स्पिकरचालक मंगलनाथ साऊंड आणि पी आय सी टी कॉलेजसमोरील दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष ओंकार खुटवर आणि स्पिकरचालक विन ऑडिओ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार राधुजी रुपनर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवजयंती उत्सव साजरा करणारी मंडळे यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते यांना वेळोवळी मिटींग घेऊन उत्सवामध्ये साऊंड बॉक्स मर्यादित ठेवणे व आवाज मर्यादित ठेवणे तसेच आकाशात प्रखर बिम न सोडणे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी सुचना दिल्या होत्या.
पी आय सी टी कॉलेजसमोरील दोस्ती ग्रुपच्या मंडळाने बेशिस्तपणे व नियमांचे उल्लंघन करुन लाऊडस्पिकर उभा करुन ध्वनिची पातळी ओलांडून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवित असल्याचे दिसून आले.
मोठ्या आवाजात गाणी लावल्याने तरुण जमा होऊन नाचत होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.
या मंडळाची सायंकाळी पावणे सात वाजता स्पिकरचा आवाज ९२.७ डेसीबल नोंदविण्यात आला. पी आय सी टी कॉलेजसमोरील जिवलग प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या स्पिकरची ध्वनीपातळी सायंकाळी ७ वाजता १०३.३ डेसीबल होती तर रात्री २१ वाजून ११ मिनिटांनी ती वाढून १०६.५ डेसिबल झाली होती.
आंगण हॉटेलसमोरील शिवरत्न प्रतिष्ठानच्या मंडळासमोरील लाऊड स्पिकरची ध्वनी पातळी सायंकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी ८८.६ डेसीबल होती. त्यानंतर रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी त्यात वाढ होऊन ती १०८.१ डेसीबल झाली होती.
या मंडळांनी लाऊडस्पिकरबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करुन डॉल्बी सिस्टीमवर गाणी वाजवून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करुन ध्वनी प्रदुषण केल्याने मंडळाचे अध्यक्ष व स्पिकरचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने पोलिसांनी ध्वनी प्रदुषक यंत्रणा/साऊंड सिस्टिम, वाहने जप्त केली नाहीत.
